बारीपाडा एक किमया..

महाराष्ट्राचा उत्तरभाग पाहताना अपेक्षा हीच होती कि डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग आणि सुख- समृद्धीचा वाटेवर असणारा महाराष्ट्राचा आद्य रहिवाशी पाहायला मिळेल. ५० हजार करोडचा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात तब्बल ५००० करोड म्हणजे १० % रक्कम ही एकट्या आदिवासी समाजावर खर्च केली जाते. त्यामुळे वाटलं होतं कि इथला रहिवासी हा आता तरी नक्कीच मुख्य प्रवाहात आला असेल. पण दरवेळी पराकोटीचा अपेक्षाभंग होतो. ५०० कोटी रूपयाच्या आसपास आदिवासी आश्रमशाळांच्या दुरुस्तीवर शासन खर्च करते. राज्यात एकूण शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत ५५२ म्हणजे जवळ जवळ ८० लाख रुपये प्रत्येक आश्रमशाळेच्या दुरुस्तीवर खर्च होणे अपेक्षित आहे तरीही इथल्या आश्रमशाळा ह्या खाजगी जागेत (झोपडपट्टीमध्ये) भरत आहे. (वास्तविक पाहता आश्रमशाळेसाठी पक्क्या इमारती असणे हा शासकीय नियम आहे.) देवळासमोरच्या भिकाऱ्यानीही शासकीय आश्रमशाळांशी तुलना केल्यास स्वतःच्या परिस्थितीबाबत अभिमान बाळगावा इतक्या दयनीय अवस्थेत इथे आदिवासी समाजाच्या मुलांना जेवणासाठी बसवले जाते. ना ताट ना वाटी. शिक्षणासाठी पाटीच्या नावानेही बोंबाबोंब असतानाच पोटात अन्न टाकण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या ताट आणि वाटीचा दुष्काळ इथल्या आदीवासी मुलांच्या माथी लिहिला जावा एवढी वाईट परिस्थिती का निर्माण व्हावी? ज्या बाबीसाठी शासनाच्या तिजोरीतून पैसा निघतो त्या बाबीसाठीच पोहचत नसेल तर किती अजगर ह्या रस्त्यात तोंड आ वासून  बसले असतील ? संध्याकाळी ५.०० ते ६.०० च्या दरम्यान दोन चपात्या आणि त्या चपातीवर वरतूनच टाकलेले पातळ वरण दिलं कि शिक्षकांनाही आजच्या दिवसाच्या कर्तव्यपूर्तीच समाधान मिळतं. त्यानंतर सरळ दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०० वाजताच नाश्ता दिला जातो. मधले १५ तास उद्याच्या नाश्त्याच्या आशेने सरकणाऱ्या घड्यांचा काट्याकडे बघत आस लावायची….
हे इथलं रोजचं चित्र.

मनावर पसरलेली मरगळीची ही काजळी घेवूनच आम्ही साक्री तालुक्यातील बारीपाडा ह्या गावी गेलो. साक्रीपासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावर डोंगर रांगांच्या  पायथ्याशी आणि कोणत्याही खिजगणतीत नसलेला साधारण एक आदिवासी पाडा.  आम्हाला आमच्या पुराणग्रंथानी किंवा परंपरेच्या ग्रंथांनी  आणि अर्थातच चित्रपटांनी एका नायकाची सवय लावून दिली आहे. तुमचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला देवरुपी नायक पाहिजे. दैना, बजबजपुरी, भ्रष्ट्राचारातून बाहेर पडायचंय कोणी तरी नायक पाहिजे  हि मानसिकता लहानपणापासून आमच्या खोलवर रुजली आहे.  म्हणून आमचे डोळे त्याच्या येण्याकडे लागलेले असतात ना कि  स्वतः त्या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न करण्याच्या.  अश्याच एका नायकाच्या येण्या अगोदर मरणासन्न अवस्थेत जगणारा हा आदिवासी पाडा आज मात्र संपूर्ण आदिवासी समाजाच्या प्रगतीला एक दिशादर्शक ठरतोय.  चैत्राम पवार नावच्या उच्च शिक्षित अवलिया असलेला हा आदिवासी तरुण २० वर्षापूर्वी वनवासी कल्याण आश्रमाच्या डॉ.आनंद फाटक ह्यांना भेटला आणि त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली.

स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करण्याच्या काळात घरच्यांच्या विरोधाला न जुमानता एअर फोर्सच्या समोरून चालून आलेल्या नोकरीला लाथ मारून चैत्राम पवार आपल्या बारीपाडा ह्या गावी परत आले. उद्देश एकच आपल्या शिक्षणाचा फायदा अंधारात चाचपडणाऱ्या आपल्या समाजाला झाला पाहिजे. गावात पाउल टाकल्यावर बोडकं झालेल जंगल पाहून त्यांचा जीव कासावीस झाला. हे असंच सुरु राहिले तर मयताच्या चितेलाही लाकडे उरणार नाहीत इतकी भीषण परिस्थिती होऊ पाहत होती. गाववाल्यांना गोळा करून जंगलाच महत्व सांगितल. कोणीही एकत् नव्हतं. आपल्या मुलांना उद्या घर बांधण्यासाठी सुद्धा दुसऱ्याकडे लाकडासाठी भीक मागावी लागेल ही मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि सुरु झाली जंगल संवर्धनाची मोहीम. कडक नियमांची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव  प्रत्येकाच्या अंतरी रुजवल्याने ह्या आदिवासी पाड्यावर आज ११०० एकरच जंगल फुलवल आहे. पण वाचताना वाटतं  तेवढं हे सोप्प नक्कीच नव्हतं.

१९९३ साली चैत्राम पवार ह्यांनी ११ सदस्यांची वन संरक्षण समिती स्थापन केली. ह्या समितीच्या कामकाजासाठी घरटी प्रती महिना ३ रुपये वर्गणी काढली गेली. वनखात्यावर विसंबून न राहता गावाने स्वतःचे दोन सुरक्षा रक्षक ह्या जंगलाच्या देखभालीवर नियुक्त केले. गावातर्फे प्रत्येक घराने  वार्षिक १ पायली धान्य त्यांना देण्याचा नियम केला गेला. चराऊ बंदी आणि कुऱ्हाडबंदी केली गेली. वृक्ष छाटल्यास १०५१ रु आणि वाहतूक केल्यास ७५१ रुपये दंड आकाराला गेला.  त्याची ठरवून वसुली देखील केली गेली. त्यामुळे अख्ख्या गावावर आणि आजूबाजूच्या पाड्यावर वचक  बसला. गावात पूर्वी ५० टे ६० फुट खोल खणला तरी पाणी लागत नव्हत . आज सरकारची कोणतीही मदत न घेता श्रमदानाने ४२५ च्या वर चार डोंगर उतारावर खणले गेले त्याचं परिणाम म्हणून गावच्या पाण्याची पातळी आज २० टे २५ फुटांवर आली आहे. अख्ख्या तालुक्यात बोर मारण्याची स्पर्धा सुरु असताना बारीपाडा हे गाव मात्र स्वतःच पाणी स्वतःच राखून आहे. गावात एकही बोर नाही . ही यशोगाथा इथेच संपत नाही. गावात शैक्षिणिक प्रगती व्हावी , मुलांनी शिकावं ह्यासाठी प्रबोधन करण्यात आले.  विना अनुमती अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिवशी १ रुपया आणि शिक्षकांना दिवसाला ५१ रुपये दंड आकारण्यात येतो. परिणामी स्वरूप आज संपूर्ण बारीपाडा गाव प्राथमिक शिक्षणात १०० टक्के यशस्वी झालं आहे. गावात महिलांचे २ बचत गट आणि पुरुषांचा एक बचत गट कार्यरत आहे. श्रमदानाने बनविलेले ३ पाझर तलाव , १३ छोटे तलाव आणि ४० विहिरी आज बारीपाडा गावा बरोबरच इतर ५ आदिवासी पाड्यांचा पाण्याला प्रश्न कायमचा निकाली काढत आहे. जिथे माणसे  जमिनीसाठी भावाचा, वडिलांचा खून पाडायला कमी करत नाहीत  तिथे बारीपाडा गावाने मात्र गावातल्या एकमेव भूमिहीन कुटुंबाला एकत्र येवून पाच एकर जमीन कसण्या लायक करून दिली आहे.

महाराष्ट्रात आज अनेक हागणदारी मुक्त गावं आहेत जिथे ग्रामपंचायत शासकीय योजनेतून १०-१५ शौचालये बांधते आणि गावाचे नागरिक शौचासाठी पुन्हा गावच्या रस्त्यावरच येवून बसतात. इथे मात्र  एका साध्या आदिवासी आदिवासी पाड्यावर ६६ शौचालये आहेत. (घरटी एक शौचालयं) जिथे उर्वरित महारष्ट्रात गावाचं सगळं सांडपाणी हे नद्यांमध्ये, ओहाळा मध्ये सोडून नद्या नाले प्रदुषित होत आहेत. तिथेच बारीपाडा गावाने मात्र ८९ शोष खड्डे खणून अख्ख बारीपाडा प्रदूषण मुक्त ठेवले आहे. (हे ही श्रमदानाने , शासनाची हाजी हाजी करून नाही)

काहीही करायचे असेल तर त्यासाठी सरकारकडेच आले पाहिजे  हि ब्रिटिश काळापासून ब्रिटिशांनी लावलेली सवय आमच्या  जनुकीय रचनेत इतकी भिनली आहे कि आम्ही राहतो त्या घराच्या रस्त्यावर सुद्धा आम्हाला झाडू फिरवायचा नसतो. कारण काय तर सरकार करेल. अश्यावेळी जिथे पूर्वी संपूर्ण गाव मिळून कुठले पीक घ्यायचे, नदी कधी साफ करायची ह्यावर सांघिक काम व्हायचा, एकजुटीला बळ मिळायचं तिथे शासनाच्या नावाने शिमगा करून आहे ती परिस्थिती अजून लयाला नेण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काहीही न करण्याने आपणच हातभार लावतो आहोत. ह्या विपरीत परिथितीत चैत्राम पवार यांनी  बारीपाड्याच्या रुपाने समृद्धी जीवनाचे सूत्र पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांसमोर मांडले आहे. आपण ते जेवढ्या लवकर आत्मसात करू तेवढ्या लवकर आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श रचना ठेवू.  चांगल्या कार्याला उशीर कधीच होत नसतो फक्त उशिरा सुरु केलेल्या चांगल्या कार्यामुळे फळं उशिरा मिळतात आपल्याला फक्त त्या उशिराची किंमत मोजावी लागत असते.

खरंच मित्रानो अजून उशीर नको असेल तर एकदा तरी पहाच……
आपलं स्वयंपूर्ण बारीपाडा ……
सलाम चैत्राम पवार …

योगेश मनमोहन परुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक

ymp-baripada6

One thought on “बारीपाडा एक किमया..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s