पेवर(ब्लॉक)च्या “फेवर”चे कारण..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे मार्गाक्रमण करत असतानाही  भारताला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांची पडलेली भ्रांत आणि वाटर , गटर, आणि मीटर ह्या तीनच मुद्द्यांवर आजही लढल्या जाणाऱ्या निवडणुका हि या देशाची आजची राजकीय वास्तवता आहे. सतराव्या लोकसभेसाठी प्रचाराचा मुद्दा अजूनही जर गरिबी हटाव हा राहत असेल तर पायाभूत सुविधांवर भाष्य करायला आम्हाला २०५० उजाडणार आहे का ? पायाभूत सुविधां बाबत बोलणाऱ्या नितीन गडकरी सारख्या काही नेत्यांचा अपवाद वगळला तर सगळ्या पक्षातील उर्वरित नेते आणि कार्यरत असलेल्या राजकीय संस्था राजकारणाचा स्वतःच्या सोयी नुसार अर्थ लावत आहेत. आधी स्वतःच भलं, मग देशाचं! ह्या अविर्भावात असल्याने ह्या देशाचा सामाजिक , आर्थिक आणि एकूणच सारा समतोल डळमळीत झालाय. डोळ्याला दिसत असून , बुद्धीला पटत असूनही कार्य नाकारण्याची वृत्ती बळावलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे पायाभूत सुविधा ह्या शब्दाचे बाळसेही ह्या देशाच्या प्रमुख शहरांमध्ये धरलेले दिसत नाही तर ग्रामीण भाग राहिला दूरच. मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत सुद्धा पायाभूत सुविधांचा बोजवारा अगदी स्पष्ट दिसून येतो.

  आज वाहने चालविण्याच्या सोडाच पण पायी चालण्याच्याही लायकीचे रस्ते मुंबई मध्ये राहिलेले नाहीत. मुंबईत रस्त्यांवर किवा पदपथांवर चालताना जर पाय अडखळलाच तर जरा खाली नजर टाका…. हमखास पेवर ब्लोकच दिसतील. साधारणतः २००२-२००३ च्या दरम्यान मुंबईत पेवर ब्लोक्सचा वापर सुरु झाला. पण “पेवर ब्लॉक्स” नेमके कुठे लावावेत हे प्रत्येक गोष्टीत ‘पे’ ची आणि ‘वर’ कमाईची सवय झालेल्या महानगरपालिकेला कदाचित आजपर्यंत समजले नसावे. किवा पेवर ब्लोक्स्च्या सततच्या देखभालीच्या आणि नूतनीकरणाच्या ‘पे’-‘वर’ कमाईने त्यांची अक्कल तरी ‘ब्लॉक’ झाली असावी. असो… ” If you don’t know how to pest, then do not copy ” असा एक वाक्यप्रचार प्रसिद्ध आहे. या पेवर ब्लॉक च्या बाबतीत असंच झालंय. पेवर ब्लॉक बसवण्याची सुरुवात परदेशात झाली. ड्रेनेज लाईन्स किवा महत्वाचे जोडरस्ते किवा ज्या ठिकाणी काही कारणास्तव सततचे खोदकाम होत असते अशा ठिकाणी हे पेवर ब्लॉक्स लावले जातात. काढावे लागले तरी काम झाल्यावर पुन्हा ते त्याच ठिकाणी त्याच स्थितीत लावले जातात.( इंटर लॉक सिस्टीम ). मुळात अत्यंत कमी वाहतूक असलेल्या जागेत पेवर ब्लॉक्स लावले जावेत हे अपेक्षित असते. आणि शास्त्रीय दृष्ट्या तेच योग्य आहे. मात्र मुंबईतले दृश्य काय तर आत्यंतिक वर्दळ असणाऱ्या ठिकाणी हे पेवर ब्लॉक्स सर्रास लावले जात आहेत.

आता शिव येथील प्रियदर्शिनी चौकाचेच उदाहरण घ्या. आज जरी हा रस्ता प्रचंड पाठपुराव्याअंती सुस्थितीत आलेला असला तरी अत्यंत महत्वाचा आणि वर्दळीचा असलेला हा महामार्ग अत्यंत घाणेरडा होता. पण ह्या रस्त्याबाबत २०१४-१५ साला पर्यंत धोकादायक असलेला हा रस्ता मुंबईच्या आजच्या अनेक रस्त्यांचे प्रतिनिधित्व करतो. ह्या रस्त्याचे विस्तारीकरण साधारणतः २००८ साली मान्य करण्यात आले होते. त्यानंतर साधारणतः लाखाच्या वर वाहनाची रोजची वर्दळ असणाऱ्या ह्या रस्त्यावर पेवर ब्लॉक्स बसवण्यात आले. चुकिच्या पध्दतीने पेवर ब्लॉक बसवल्याने ह्या रस्त्यावर ठिकठिकाणी पेवर ब्लोक्स्चे उंचवटे निर्माण झाले होते ( प्रत्येक वर्षी दुरुस्ती करूनही). चेंबूर वरून एखादी गरोदर स्त्री जर वाहनाने शिवच्या महापालिका रुग्णालयात न्यायची असेल तर ह्या झोपाळ्याच्या रस्त्यावरच बालकाचा जन्म होईल अशी अवस्था. महामार्गाचा अर्धा पट्टा सिमेंट कॉंक्रिटचा आणि अर्धा पट्टा पेवर ब्लोक्सचा हि गोष्ट मनपा, एम.एम.आर.डी.ए., पी.डब्ल्यू.डी., एम.एस.आर.डी.सी. च्या अभियंत्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा परीणाम होता. पूर्वी डांबरी रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने बनवले जायचे म्हणूनच उत्तम टिकायचेही. पण हे नवीन पेवर ब्लोक्स्चे रस्ते कसे बनवायचे याची साधी माहितीही ना अभियंत्यांकडे आहे ना कंत्राटदारांकडे असे वाटते. पुढे दिलेली माहिती वाचा आणि आपल्या आजूबाजूला पेवर ब्लोक्स्ने बनवले जाणारे रस्ते आणि पदपथ कसे बनवले जातात ह्याची तुलना करून पहा.

पेवर ब्लोक्सचा रस्ता/पदपथ बनवताना, पदपथाचा खालचा स्तर हा सपाट(प्लेन) आणि मजबूत हवा. (मुंबईतल्या कोणत्याही पदपथांवर पेवर ब्लॉक्स बसवताना हि काळजी घेतली जाते का?) त्यानंतर त्याच्यावर साधारणतः १५ मिमी ची चांगल्या प्रतीची वाळू (जिच्यात माती किवा चिखलाचे मिश्रण नसावे) सपाट आणि समतोल पसरावी. त्यानंतर कमीत कमी ६०,००० किलो वजन पेलण्याची क्षमता असलेले ट्राफीक हेन्डलिंग पेवर ब्लॉक्स (साधारणतः १०० मिमी जाडीचे)वाळूवर व्यवस्थित ठेवावेत. (प्रियदर्शनी चौकातल्या प्रचंड वाहतुकीसाठी पेवर ब्लॉक्स लावताना निविदेत ८० मिमी जाडी दिली होती… हा बौद्धिक दिवाळखोरीचा पुरावाच आहे) अशा प्रकारे ५-६ ओळीत पेवर ब्लॉक्स ठेवल्यानंतर ते बाजूने व्ह्यायब्रेटर च्या सहाय्याने घट्ट बसवायचे ( हा व्ह्यायब्रेटर साधारणतः ४०-५० हजारात मिळतो फक्त) प्रत्येक ५-६ ओळीनंतर हीच क्रिया परत परत करायची. अशा प्रकारे ब्लॉक्स पसरून झाल्यावर त्यावर पुन्हा प्लान्क व्ह्यायब्रेटर च्या सहाय्याने वरून दाब द्यायचा. जेणेकरून सर्व ब्लॉक्स एका पातळीत येतील आणि लॉक होतील( शिव चौकात पेवर ब्लोक्स्ची पातळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे…. का?) आता सर्वात महत्वाचं काम जे मुंबईत कुठेच होत नाही. अशा प्रकारे ब्लॉक्स बसवल्यावर त्यांची जेथून सुरुवात केली आहे व जेथे शेवट होत आहे तेथे कमीत कमी ४ इंचाचा उभा कट मशिनच्या सहाय्याने मारला असला पाहिजे. त्यात नंतर वितळलेले डांबर भरून ओळीचे उघडे तोंड बंद करावे. पण आपल्याकडचे सर्व पदपथ पहा, त्यावरचे ब्लॉक्स कडेला दगडानेच फोडून एका ओळीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यात वाळू भरतात. कालांतराने त्यातली वाळू निघून बंध सैल होतो आणि एक एक पेवर ब्लॉक निघायला लागतो….. मुंबईतल्या अनेक भागात ४ महिन्यात पेव्हर ब्लॉक बदलण्याचे काम सतत नजरेला पडते ते यामुळेच . अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी दुरुस्तीच्या आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली पेव्हर ब्लॉकच्या पुन्हा नवीन निविदा काढण्याचा हा शिरस्ता सध्या तरी मुंबईचा खरं तर भारतातल्या प्रत्येक महानगराचीच कथा आहे. तुमच्या अाजुबाजुला पेवर बदलतांना दिसले तर तारीख लक्षात ठेवा त्याच्या पुढच्या दोन ते चार महिन्यात पुन्हा नव्याने पेवर ब्लॉक बसवतांना पर्यायाने तुमच्या खिशावर सरकारी आणि कंत्राटदार हात मारतांना दिसतील.

योगेश मनमोहन पारुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषक

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s