आपल्या इतिहासावर आपलेच संस्कार ..

नमस्कार मित्रहो,
काही तांत्रिक कारणामुळे मधले काही आठवडे आपला ब्लॉग च्या माध्यमातून संपर्क होऊ शकला नाही. मात्र आता त्या तांत्रिक त्रुटी दूर करून दर आठवड्याला तुम्हाला पायाभूत सुविधांबाबत ची नवी माहिती देण्याकरता येणार आहे. मध्यंतरी पडलेला विरामानंतर नेमका कोणता विषय घेऊन तुमच्यासमोर यावे हा विचार सुरु होता. पायाभूत सुविधांशी संबंधित विषय तसे होतेच पण तेवढ्यात वृत्तपत्र आणि समाजमाध्यमांमध्ये असलेल्या एका बातमीने लक्ष वेधून घेतले. बातमी होती शिवाजी महाराजांचा समुद्रात उभारण्यात येणाऱ्या अश्वारूढ पुतळ्याचा रचनेत बदल होणार. जवळपास ३ वर्षांपासून अश्वारूढ असणारा पुतळा अचानक उभा किंवा सिंहासनाधिस्थित करण्याचा विचार सुरु झाला, असे का ? उत्तर एकच आहे अजूनही आमच्याकडे भविष्य डोळ्यासमोर ठेवून पाहणारे अधिकारी नाहीत.

हे सर्व सुरु असताना आम्ही भेट दिलेला जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याच्या किल्ला आठवला . ह्या किल्ल्याची ओळख तशी झांशीच्या राणीचे आजोळ म्हणून सांगतात. ह्या किल्ल्याची डागडुजी आणि संवर्धन ज्या पद्धतीने होत होतं ते पाहून महाराष्ट्रातील पुरातत्व व संवर्धन खाते, विभाग ह्यांची स्थिती अंधेरी नगरी चौपट राजा अशीच दिसून येते. ह्याच किल्ल्याची खरंतर ह्या अश्या सर्व किल्ल्यांची, गडांची ऐतिहासिक संवर्धित वास्तूंची हीच स्थिती आहे…

१८५७ मध्ये ब्रिटीशांच्या विरोधातला असंतोष केवळ उत्तर भारतातच नाही तर महाराष्ट्राच्या उत्तरेतही खदखदत होता. १८२१ ते १८५७ च्या काळात पारोळा व आजूबाजूच्या परीसरात ठिकठीकाणी इंग्रजांविरोधात स्वराज्य मिळवण्यासाठी उभारले जाणारे बंडाचे निशान पाहत तो अतिशय गर्वाने उभा होता. आणि आज सन… 2019 … भग्नतेच्या उदासिनतेची छटा घेवून तो अतिशय जीर्ण अवस्थेत स्वतःच्या भोवतालचे मुताचे पूर आणि वाढलेली हागणदारी विपन्नावस्थेत पाहत उभा आहे.

 

 

मध्यंतरी महाराष्ट्रातील गड किल्यांच्या दुरावस्थेबाबत निसर्ग जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात सादर केल्याची बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचण्यात आली. महाराष्ट्रातील किल्ले हे उंचावर असल्याने वारा, पाऊस, प्रखर ऊन ह्यामुळे गड-किल्लयांची झीज होत असल्याचे शासनाचे म्हटले आहे. शासनाच्या ह्या अकलेचे तारे तोडणाऱ्या निवेदनाचे समर्थन होऊच शकत नाही मात्र त्यांच्या ह्याच निवेदनाचा आधार घेतला तर मग भुईकोट किल्ल्यांच्या जर्जर अवस्थेला जबाबदार कोण?

 

 

पारोळ्यातील किल्ल्याचेच उदाहरण घ्या .. मुख्य वस्तीत असलेला बाजारपेठेच्या अतिक्रमणाने वेढला गेलाय किल्ला भुईकोट असल्याने किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच खंदक सदृश्य तलाव आहे. आज मात्र तो तलाव प्रदूषित झाला असून प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचे पेले, घरघुती कचरा तसेच तटबंदीला लागून असलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेले मल-मूत्र तलावात सोडल्यामुळे त्या तलावाचे गटार झाले आहे. किल्ल्याचे उत्तराभिमुख असलेले मुख्य प्रवेशद्वार आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर शहराचे सार्वजनिक शौचालय व मुत्रालय झाले आहे. तुटून पडलेला आणि डुकरांच्या पैदाशीचे घर बनलेल्या प्रवेशद्वारावरच मुताच्या धारी सोडल्या जातात. मुताचा हा ओघळ ओलांडून आत असलेल्या आणखी एका प्रवेशद्वाराची अवस्थाही काही वेगळी नाही. त्यालाच लागून असलेल्या तटबंदीवर कधीही गेल्यावर शौचास बसलेले लोग हमखास दिसतात. महत्वाचे म्हणजे हि वास्तू पुरातन व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र द्वारा सरंक्षित म्हणून घोषित आहे. आतापर्यंत वाचलंत ते तर किल्ल्याच्या बाहेरील बाजूची परिस्थिती होती खरी गोम तर किल्ल्याच्या आतमध्ये आहे.

 

 

आत गेल्यावर समोरच मुख्य किल्ला व मध्यभागी बालेकिल्ला नजरेस पडतो. सध्या या ठिकाणची डागडुजी पुरातत्व विभागाकडून होत असल्याने बऱ्याच ठिकाणी पुनर्बांधणीची कामे सुरु आहेत. पुनर्बांधणी म्हणजे किल्ल्याचे सरसकट काँक्रीटीकरण करणे. पुरातत्व विभागाने एका लोकल कंत्राटदारास काम देऊन या किल्ल्याचे मूळ सौन्दर्य पूर्णतः बाधित करून टाकले आहे. किल्ल्याची तुटलेली तटबंदी सिमेंट काँक्रीट भरून उभी केली आहे. किल्ल्यात बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर सगळीकडे काँक्रीटीकरण करून किल्ल्याची मूळ सरंचनाच बुजवून टाकली आहे.

 

 

किल्ल्यावर कुठली खोली कुठे होती, कुठे कोठार होते, कुठे राजगृह होते हे सगळं-सगळं काँक्रिटीकरणामुळे कळण्याच्या पलीकडे गेले आहे. बरं ह्या काँक्रिटीकरणाचा दर्जाही एवढा सुमार आहे कि केलेलं काँक्रिटीकरणही अनेक ठिकाणी तुटून पडले आहे. ठिकठिकाणी उगवलेल्या झाडा -झुडुपांमुळे अनेक भुयारे, विहिरी अजूनही उघड होऊ शकलेल्या नाहीत. किल्ल्याच्या परिसरात बहुतेक कचेऱ्या, कोठारे, घरे यांचा वापरही लोकांकडून व कारागिरांकडून धार मारण्याचा आडोसा म्हणूनच केला जात आहे. बालेकिल्ल्याच्या चार गोलाकार भव्य बुरुजांमध्ये संपत्ती सापडेल ह्या लालसेने इंग्रजांनी चारही बुरुज खोदून विद्रुप केले होते; मात्र आज तर आपणच ऐतिहासिक वास्तूंवर व त्यांच्या इतिहासावर लघुशंका करून त्यांचे विद्रुपीकरण चालवलंय त्याचं काय ?

parola killa ymp13

parola killa ymp14

पारोळ्याच्या भुईकोट किल्ला हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण म्हणून बघुयात; मात्र महाराष्ट्रातील अनेक किल्ले ह्यासारख्याच कमी-जास्त परिस्थितीतून जात आहेत. पुरातत्व विभाग आणि शासन नेमकं काय काम करतंय याचा उलगडा होत नाही. राज्यात नेमके किती किल्ले आहेत, गड कोणते, वाडे कोणते? नि गढ्या कोणत्या ? ह्याचं साधं वर्गीकरण देखील अजून पुरातत्व खाते आणि शासनाला करता आलेले नाही. ह्या बाबतीत शासनाचं कुठलंच ठोस धोरण नाहीये; शासन दरबारी हे सगळं रामभरोसे सुरु असताना नागरिक म्हणून आपण तरी काय करतोय ? प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या यांनी आपणच आपला ऐतिहासिक ठेवा कुरतडून टाकतोय हे आपलंच आपल्याला कळू नये ? एवढे निर्लज्ज आणि बेदरकार झालो आहोत आपण ? आपली ओळख आपल्या इतिहासाने होते आणि त्याचाच एक भाग असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा आपणच जतन न करता त्याच्यावरच मुतणार असू तर शासनाला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे ….

योगेश म परुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक 

2 thoughts on “आपल्या इतिहासावर आपलेच संस्कार ..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s