हॅप्पी खड्डे टु यू …

‘ हे खूप भयानक आहे ’

‘ माणसे मारायचा कारखाना आहे हा ’

‘माणसांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे?’

‘ या देशात राहावे की नाही, हा विचार हे असलं काही वाचून पुन्हा करावासा वाटतो ’

“मुंबईतल्या पूलांच्या खुनाची गोष्ट” वाचल्यानंतर आलेल्या गडद प्रतिक्रियांमधल्या ह्या काही ठळक प्रतिक्रिया. अनेक लोकांनी प्रत्यक्ष संपर्क साधून काहींनी मेसेजेसद्वारा याविषयाबाबतीत चर्चा केल्या. खरचं एवढे भयानक स्वरूप आहे? असं विचारणारे देखील अनेक होते. ह्या ठिकाणी पुन्हा तेच सांगतोय आपल्या दुर्दैवाने आणि यमाच्या सुदैवाने हे खरे आहे. मुंबईतल्या ब्रिजेसची देखभाल ही अत्यंत ढिसाळ पद्धतीने होते आहे. मुळात ती देखभाल नसून चालढकल आहे. हजारो लोकांचा माथ्यावर प्रशासनाने ही मरणाची टांगती तलवार लटकवून ठेवली आहे.

खरंतर मुंबईचे ब्रिज हा विषय रस्त्याला खड्डे का पडतात हे तपासताना पुढे आला होता. प्रत्येक पावसाळ्यात पडणारे खड्डे हे नेमके कोणाचे अपयश आहे? हे अभ्यासत असताना पुढे आला होता. त्यामुळे या लेखात खड्डे दरवर्षीच कसे पडतात ह्यावर थोडा प्रकाश टाकतो. आणि हे देखील बघूया की नेमक कुठे चुकते की बांधलेला रस्ता वारंवार खड्ड्यात हरवतो. माझ्या तरुण नुकत्याच वयात येणार्‍या मित्र-मैत्रीणिंची  माफी मागून सांगावेसे वाटते की, मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे आणि नुकत्याच हार्मोन्स बदलत असलेल्या तरुण किंवा तरुणीच्या गालावरील मुरमे दोन्ही सारखीच.. मूळ रस्ता आणि मूळ चेहरा दोन्ही शोधावे लागतात. उदाहरण जरी विनोदी असले तरी वास्तव हेच आहे. मुंबई सारख्या महानगरात रस्ता बांधला गेला की तो पुढे त्यावर किती खड्डे आहेत यावरून ओळखला जातो. जसं हिंदमाता म्हटले की पावसाळ्यात पाण्याने भरणारा सकल भाग म्हणून ओळखला जातो अगदी तसाच. यासाठी मुळात विषय असा आहे कि रस्त्याला खड्डे का पडतात?

रस्त्यात खड्डे पडायचे किंवा पाडले जाण्याचे महत्वाचे कारण आहे रस्त्याच्या  निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची गुणवत्ता. हेच  कुठल्याही डांबरी रस्त्यावर  खड्डे पडण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे. आपल्याकडे तीन प्रकारच्या ग्रेडचं डांबर उपलब्ध आहे. पहिली ग्रेड ३०-४०. हे डांबर सर्वात चांगलं आणि उच्च गुणवत्तेचं मानलं जातं.  रस्ते निर्मितीसाठी महापालिका  जेव्हा निविदा मागवते तेव्हा त्यात कंत्राटदारांनी याच ३०-४० डांबराचा वापर करावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं पण, प्रत्यक्षात कंत्राटदार करतात भलतंच. ६०-७० आणि ८०-१०० ह्या ग्रेडचं डांबर जे निम्न गुणवत्तेचं असतं ते कंत्राटदार वापरतात. हे डांबर रस्त्याला पुरेसा टणकपणा, टिकावूपणा  देऊ शकत नाही. भारतात वर्षभर तापमानात बदल होत राहतात  त्याचा परिणाम रस्त्यांवर होतोच पण कमी प्रतीच्या वापरलेल्या डांबरामुळे रस्त्याची धूप, झीज  कमालीच्या वेगाने होत राहते. उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसामुळे डांबराच्या रस्त्याला सूक्ष्म भेगा पडतात. पावसाचं सर्वच पाणी काही गटारांतून वाहून जात नाही (गटारी किंवा वाहत्या पावसाचे नाले मुंबईतल्या अनधिकृत झोपडपट्टीतले मलमुत्र त्यात टाकले जात असल्याने बुजले जात आहेत. शिवाय हॉटेल मधून प्रक्रिया न करता तवंग युक्त सांडपाणी सरळ स्ट्रोम वॉटर ड्रेनेज मध्ये टाकल्यामुळे हे नाले चोकअप झाले आहेत, म्हणून). बरंचसं पाणी रस्त्यावर साचतं. ते पाणी या भेगांमध्ये जातं आणि ते प्रसरण पावल्यानंतर ह्या भेगा आणखी मोठय़ा होतात व  त्यातूनच रस्त्याला खड्डे पडतात, ymphbdkhadde6

दरवर्षी पाऊस पडला रे पडला कि रस्त्यांना खड्डे पडतात. आता नेहमी नेहमी खड्डे पडणे हे नित्याचेच झालेले असताना हे खड्डे बुजवण्यासाठी तरी महापालिकेने तत्पर असावे पण इथे तर तिथेही बोंब आणि गोम आहे. आज आम्ही २१व्या शतकात असल्याची, एकूण डिजिटल युगात असल्याची टिमकी मिरवतो, नॅनो टेक्नॉलॉजीच्या बढाया मारतो पण याच काळातल्या शतकातही मुंबई महापालिका मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे हाताने, घमेल्यात खडी-डांबर टाकून  भरण्याची पद्धत अवलंबते. ही पद्धत मुळातच पूर्णपणे चुकीची आहे. कारण अशा पद्धतीने खड्डे भरताना रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा दाब पडत नाही. त्यामुळे खड्डे पडलेला जुना रस्ता आणि त्यात भरली जाणारी नवी सामुग्री एकजीव होण्याची सुतराम शक्यता नसते.  खड्डा बुजवण्याच्या शास्त्रीय पद्धत आहे ज्यानुसार खड्डय़ाभोवती एक चौकोन काढून तेवढा संपूर्ण भाग नव्या सामुग्रीने भरायचा असतो. कारण आज ज्या ठिकाणी खड्डा पडलेला दिसतो त्याच्या आजूबाजूचा थोडा भागही खराब झालेला असतो. तिथेही भविष्यात खड्डा पडण्याची शक्यता असते. या शास्त्रीय पद्धतीलाच  कंत्राटदार सोयीस्कर रित्या  बगल देताना सर्रास आठळून येतात. अश्यावेळी कंत्राटदार निव्वळ खड्डा पडलेला भाग बुजवतात, पण पैसे आकारताना मात्र खड्डय़ाभोवतीच्या चौकोनाच्या दराने आकारतात.

यापूर्वी महानगरपालिकेत मुख्य रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठीची कंत्राटे मध्यवर्ती एजन्सी मार्फत देण्यात येत होती तर ६० फुतापर्यंतच्या रस्त्यांचे कंत्राट वार्ड पातळीवरून दिले जायचे . हे काम पालिकेच्या रस्ते विभागाच्या कर्मचारी वर्गाकडून व्हायचीत. यात रस्ते बांधले जात असताना त्यांचा कामावर अभियंते देखरेख करीत असत. अभियंते पाहणी करायचे तर कनिष्ठ अभियंते तपासणी करायचे, परंतु गेल्या दहा वर्षापासून कंत्राटदार लॉबीने महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांना आपल्या मुठीत घेवून लहान-मोठ्या सर्वच रस्त्यांची कामे आपल्या पदरात पाडून घेतली. कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधारी यांची युती जुळून भ्रष्टाचारी आघाडी झाली. नितीमत्ता, कर्तव्य हे सारेच धन दांड्ग्यांचा पायाशी स्वाहा : केले असल्यामुळे आत्ता अभियंते पाहणी करीत नाहीत. रस्ते बांधले कसे ? खड्डे पडले कसे?  खड्डे बुजविले कि नाही? याची जी माहिती कंत्राटदार देतील तीच त्यांचे हे धृतराष्ट्र अधिकारी मान्य करतात यामुळे  मुंबई महापालिकेची तिजोरी रिती करण्याचा प्रकार मात्र बिनदिक्कत सुरु आहे. त्यातही मुंबई महापालिका अशी एकमेव महापालिका असेल जी रास्ते बनवण्यासाठी तर निधि मंजूर करतेच  मात्र नंतर त्याच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी देखील निधि मंजूर करते. आहे की नाही गम्मत? विहित मुदतीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी ही कंत्राटदारची असते. त्याला ते खड्डे  रस्ते बांधण्यासाठी मंजूर केलेल्या रकमेतच दुरुस्त करायचे असतात असे असताना  देखील कंत्राटदारांचे उखळ पांढरे करण्याचा हा प्रकार पालिका अधिकारी, अभियंते यांच्याकडून सुरू असतो. अस नसतं तर काळ्यायादीत टाकेलल्या कंत्राटदारांना पुन्हा काम देवून पालिका प्रशासनाने सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी खेळ नसतं चालवला.

पालिकेचा हा संतापजनक कारभार नेमका मांडायचा झाला तर तो गारवा या मराठी अल्बम मधील्या गीता आधीच्या कवी सौमित्र यांच्या कवितेच्या विंडंबनेच्या माध्यमातून मांडता येईल. असा…

दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी अस होत,

रस्त्यातल्या भेगात पाणी जावून खड्ड्यांचं साम्राज्य येतं.

तरी माणसं चालत राहतात, मरत राहतात खड्ड्यात

मुर्दाड मनपाचं खाटकी वागणं या ओल्याचिंब दिवसात..

योगेश मनमोहन पारुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषक  

ymp-khadde

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s