मुंबईतल्या पूलांच्या खुनाची गोष्ट…

Building A Better America Through A Transportation Construction हे अमेरिकेचे ब्रीदवाक्य! अमेरिकेचा विकास हा देशांतर्गत असलेल्या उत्तमोत्तम रस्त्यांमुळे झाला हे अमेरिकेचे अध्यक्ष हि मान्य करतात. (शिवाय भारताचे रस्ते परिवहन मंत्री श्री नितिन गडकरी यांच्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीच्या मागे देखील हेच वाक्य मोठ्या अक्षरात फ्रेम करून लावले आहे.) अमेरिकाच काय तर एकंदरीतच प्रगत देशांवर एक नजर फिरवली तरी त्यांचा विकासात रस्त्यांचा वाटा किती महत्वाचा आहे हे प्रकर्षाने दिसून येते. याउलट २०२० सालापर्यंत जागतिक महासत्ता होण्याचा स्वप्नं पाहणाऱ्या (नि दाखवणाऱ्या) भारताचा हा प्रवास मात्र खड्ड्यांनी(अडथळ्यांनी) भरलेला आहे. ह्या खड्ड्यांमध्ये निकृष्ट पायाभूत सुविधा, भ्रष्टाचार, शिक्षणाचे बाजारीकरण, बेरोजगारी, अनारोग्य या खड्ड्यांसोबतचं दळण-वळणाला लायक नसलेले रस्ते हे हि एक महत्वाचे कारण आहे. मुंबईचा रस्त्यांवरच्या वाहतुकीवर एक नजर टाकली तरी ह्या शहरावर असणाऱ्या अतिरिक्त बोज्याची कल्पना येते. काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर भारत सरकार कडून एक जाहिरात दाखवली जायची. दोन टोमॅटो बसतील एवढी जागा  असलेल्या काचेच्या बरणीत जेव्हा तिसरा टोमॅटो टाकण्यात येतो तेव्हा तो व अगोदरच  टोमॅटो दोन्ही  फुटतात  व बरणी देखील खराब होते. एक किंवा दोन बस.. ह्या कॅच लाइनखाली हि कुटुंब नियोजनाची “जनहितार्थ” दाखवली जाणारी जाहिरात आणि आजची मुंबईची एकंदरीत परिस्थिती हि सारखीच भासते आहे. लाखो वाहने धावणाऱ्या मुंबईचा रस्त्यांची वाट हि हजारो खड्ड्यांनी व्यापलेली आहे.

मुंबईचा कुठल्याही रस्त्यावर फिरताना खड्डा दिसणार नाही हे क्वचितच घडेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे असणारे मुंबई शहरातील रस्ते हे भविष्यकालीन वर्दळ लक्षात घेवून बांधले  गेले पाहिजेत हे वेगळे सांगायची गरज नाही. कारण हा पायंडा ब्रिटीशांनी पाडला आहेच. ह्याचे उदाहरण  द्यायचे झाले तर मुंबईतील टिळक ब्रिजचे देता येईल. दादर मधला टिळक ब्रिज लोखंडी बांधकाम असणारा हा ब्रिज १९३० साली बांध्यात आला होता. त्यावेळी वाहनांची घनता हि ३०० म्हणजे दिवसाला ३०० वाहने त्या पुलावरून जातील अशी गृहीत धरली गेली होती. आणि भविष्यात ५००० वाहने त्या पुलावरून जातील हा भविष्यकालीन विचार करून या ब्रिजची बांधणी करण्यात आली होती. आज त्याचं ब्रिजवरून दिवसाला १० ते १५ हजार वाहने जातात. हे झाले ब्रिटीश कालीन उदाहरण आत्ताची परिस्थिती काय ?  लालबागचा पुलावर उद्घाटनाचा दुसर्याच दिवशी खड्डे पडतात. करोडो रुपये खर्च करून बनवलेला वाराणसीचा आदर्श पूल पाहिल्याच पावसाळ्यात खड्यांची चाळण होतो ही आत्ताची उदाहरणे. या तिन्ही उदाहरणात पराकोटीचा विरोधाभास आहे. दूरदृष्टी जपणारा ब्रिटीशांचा हा पायंडा पुढेही अमलात आणायला हवा होता मात्र, इच्छाशक्तीचा अभाव व दळभद्री प्रशासन व भ्रष्ट राजकारणामुळे आज मुंबईचा रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे. प्रशासकीय अनास्था किंवा चालढकल वृत्ती कशी असते याचे ताजे उदाहरण म्हणजे मुंबईत अंधेरीत कोसळलेला रेल्वेवरचा ब्रिज. काय वाटतं हो का कोसळला असेल हा ब्रिज? याचे कारण जाणून घ्यायचे असेल तर पुन्हा आपल्याला टिळक ब्रिज कडेचं यावे लागेल.

ब्रिटीशांनी हा ब्रिज बोल्ट आणि रिबिट या प्रमाणे बांधलेला आहे. तो तयार केला गेला लंडन मध्ये आणि इथे आणून केवळ जोडला गेला रिबिट आणि बोल्टच्या सहय्याने. आजही या पुलावर गेल्यावर आपल्याला ते रिबिट दिसतील केवळ हाच नाही तर एल्फिन्स्टनच ब्रिज देखील याच प्रमाणे बांधला गेला आहे. टिळक ब्रिज चे हे रिबिट हळू हळू गायब होत आहेत. ते कोणी काढून नेतय की स्वतः हून गळून पडता आहेत हे पहायची तसदी प्रशासन घेणार नाही. याहून भयप्रद अश्या दोन गोष्टी आहेत त्यातली पहिली जी ब्रिटीशांनीच घालून दिली होती ती म्हणजे की टिळक ब्रिज खालून ट्रेन जाणार नाही. त्याकाळी वाफेवरची इंजने होती हा लोखंडी पूल असल्याने वारंवार वाफ लागल्याने तो गंजण्याची भीती होती म्हणून त्या वेळी त्याखालून रेल्वे जाणार नाही याची दक्षता घेतली गेली होती. आता तुम्ही विचार कराल की आता विजेवर चालणार्‍या रेल्वे आहेत मग ह्या मुद्दयाची उजळणी का? तर ती अश्यासाठी की ह्याच टिळक ब्रिजच्या खाली काही संसार उघड्यावर थाटले गेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते आहेत त्याच परिस्थतीत आहेत. हाकलले की ते पुन्हा तिथे येवून बस्तान मांडतात. त्यांच्या रोजच्या पाणी तापवणे, स्वयंपाक करणे या मुळे देखील या पूलाला धोका निर्माण झाला आहे. (लक्षात ठेवा पाण्याचा प्रचंड प्रवाह डोंगर नाही फोडू शकत मात्र पाण्याची संतत वाहणार्‍या धारेमुळे मोठे मोठे पहाडदेखील कालांतराने नहिशे होतात) त्यामुळे केवळ टिळकब्रिजच नाही तर मुंबईच्या सर्वच ब्रिज खालून झोपडपट्टी हटवली पाहिजे.

आता मुद्दा क्रमांक २ ज्याने तुम्हाला हे समजायला सोपे होईल की मुंबईतील जुने पूल धोकादायक कसे होत आहेत? तर टिळक ब्रिजवर आजही गेलात तर तुम्हाला काय दिसते? पदपथावर फरश्या त्या फरश्यांखाली सीमेंट. सिमेंटच्या खाली पेवर ब्लॉक, ब्लॉक च्या खाली अजून फारशी किंवा कोंक्रिटीकरण. त्यातून गेलेल्या वायर. हाच विषय पूलावरील रस्त्याचा एकाच वेळी हा रस्ता तुम्हाला डांबरी दिसेल लगेच पेवरब्लॉक दिसतील त्याखाली कोंक्रिटीकरण दिसेल. आणि खड्डा दिसला तर त्यात तिन्ही गोष्टी एकत्र दिसतील. आहे की नाही गम्मत एकाच रस्त्यात पेवर ब्लॉक, डांबरीकरण आणि कोंक्रिटीकरणसुद्धा.॰ वर्षोगणिक या पूलांवरचे कृत्रिम वजन टनोगणती वाढते आहे. त्यामुळे ब्रिजचा पायावर वजन वाढून एकतर तो पायासकट तरी जमिनीत आत धसेल (मुंबईच्या समुद्र किनार्‍याजवळील माती खरी होत जावून भुसभुशीत होत चाललील आहे. ह्यावरही स्वतंत्र प्रकाश टाकेल) किंवा तुकडे होऊन पडेल. त्यामुळे कृत्रिम वजन, पूलाखालील अतिक्रमणे, पूलावर वाढणारी झुडपे, पूलाच्या मूळ रचनेत पिंपळाच्या झाडांची दगड फोडून आत शिरलेली मुळे ह्या सार्‍या गोष्टींनी या पूलांना वेंटिलेटर वर आणून सोडले आहे.

या बाबतीत प्रशासनाला विचारल्यावर त्यांची उत्तर ते या पृथ्वीतलावरचे नाहीतच अशी असतात. इतर प्रशासकीय विभागांवर सदर बाबतीत चालढकल करणे एवढेच त्यांना उत्तम जमते आहे. प्रशासनाची ही चालढकल लोकांना मृत्युच्या दाढेत ढकलते आहे हे त्यांना कधी समजणार? पूलांचे न होणारे ऑडिट. मुंबईत वाढत जाणारा वाहनांचा पसारा, सार्वजनिक वाहतुकीचे वाजलेले १२ ह्या सर्वांचा आपसूकच ताण पडतो तो इथल्या पायाभूत सुविधांवर. ही केवळ मुंबईची बाब असे नाही प्रत्येक शहरात या बाबींचा फज्जा उडाला की ताण पायाभूत सुविधांवरच येतो.

मुंबईशी नाळ नसलेले प्रशासकीय अधिकारी हा देखील या बाबतीतला एक कंगोरा आहे असे देखील वारंवार वाटत राहते तसे वाटण्यास वाव देखील आहे. मागे गिरगाव मधल्या विठ्ठल मंदिराचा विषय याचीच साक्ष देतो. विकासकाने पालिकेतील अधिकार्‍यांना हाताशी धरून शेकडो वर्ष (साधारण १८०० सालापासून ) जुने असलेले विठ्ठल मंदिर (मंदिरासाठी जागा द्यायला लागू नये म्हणून ) ३० एक वर्षापूर्वीचे दाखवले होते. पालिकेतील अधिकार्‍यानीही कागदपत्रात तसे फेरफार पैसे घेवून करून दिले. नंतर मंदिर तोडण्याविरोधात गिरगावातील रहिवासी न्यायालयात गेल्यावर संपूर्ण बनाव उघडकीस आला आणि न्यायलयाने मंदिर तोडण्यावर स्थगिती दिली. आजही हे प्रकरण न्यायलयात आहे. सांगायचा मुद्दा हाच की मुंबईशी नाळ जोडलेली नसेल, आपण कुठे इथे राहणार आहोत हा विषय असेल तर सार्वजनिक व्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही. कर्तबगार अभियंते नसणे किंवा कामचलावू अभियंते आणि तांत्रिक तज्ञ असणे हे देखील मुंबईच्या पायाभूत सुविधेसाठी खूप भयंकर आहे. पुन्हा उदाहरणासाठी दादरच्या टिळक ब्रिज वर जावे लागेल. टिळक ब्रिजला जोडून एक नवा ब्रिज पूर्वेकडे जाताना तयार करण्यात आला आहे. हा ब्रिज तयार करतांना मुळात विचार करून करण्यात आलेला नाही. अगदी ९० अंशात तयार केलेला हा ब्रिज रहदारी कमी करण्यासाठी बनावला असेल तर ते रहदारीची कोंडी करणारे ठरणार आहे कारण रहदारी कमी करण्यासाठी तो टिळक पूलाला समांतर असला पाहिजे होता. तो समांतर नसल्याने मध्येच ९० अंशात जोडल्याने त्या अंशावर पूर्वी पेक्षा जास्त रहदारीची कोंडी होणार आहे. कारण दादर पच्छिमेकडून येणारी वाहने आणि त्या नव्या ब्रिजवरून येणारी वाहने ९० अंशात एकमेकांसमोर येतील आणि वाहने सरकायलाच जागा असणार नाही. वजन वाढत राहिल्याने दादरचा टिळक ब्रिज अजून जास्त कमकुवत होईल. एकंदरीत प्रशासनाची अनास्था, दर्जा नसलेले अभियंते, मुंबईशी नाळ नसलेले कर्मचारी, अधिकारी आणि राम भरोसे चालण्याची वृत्ती या मुले मुंबईतल्या पूलांच्या मरण ओढवले आहे. मुंबईच्या दळणवळनाचा बोरियबिस्तरा या पूलांवरच अवलंबून आहे. तेव्हा संपूर्ण शहराची वाताहत होण्याधीच, वेळ निघून जाण्याआधी पूलांच्या खालून वाहून जाणारे पाणी थांबवलेले बरे.

योगेश मनमोहन परुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषक

ymp-khadde14

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s