चंद्रभागेच्या तिरी…

प्रचंड उर्मित, शिस्तीत आणि नादात, लयात सुरात वारीतली चंद्रभागा वाहत असते.  अगदी शुभ्र रंगात, अंगावर तांबडा रंग लेवून, नागमोडी वळणाने भीमा खोर्‍याच्या समांतर चालणारी वारकर्‍यांची वारीरूपी चंद्रभागा तल्लींतेने विठुरायाच्या अथांग भावसमुद्रात विलीन होण्याकरता पंढरपूरसाठी निघालेली असते. आषाढी एकादशीला हीच वारीरूपी चंद्रभागा श्री क्षेत्रातल्या विठुरायाच्या तीर्थ चंद्रभागेला येवून मिळते आणि अवघा रंग एकची झाला हा प्रत्यय येतो. अवघा आसमंत शुभ्रेतेत आणि केसरी रंगात न्हावून निघलेला असतो. इतर वेळी कोरडे असणारे चंद्रभागा नदीचे पात्र या काळात मात्र भरभरून वाहत असते. वारकर्‍यांची वारी जशी विठ्ठलाच्या चरणस्पर्शाशिवाय अपूर्ण तशीच ती चंद्रभागेचे तीर्थ आकंठ स्पर्शून घेण्याशिवाय पूर्ण होत नाही. वारीच्या काळात तीर्थ असणारी चंद्रभागा इतर वेळी पाणी वाहून नेणारी नदी तेवढी उरत असते. चंद्रभागेच्या तिरी उभा असणार्‍या विठूच्या साक्षीनेच हा सारा खेळ युगान्युगे घडतो आहे. फरक एवढाच झालाय की लोक आधी प्रशासन नावाची यंत्रणा नसल्याने स्वतः पुढाकार घेवून चंद्रभागा (खरतर प्रत्येक नदी ) स्वच्छं ठेवत होते, मग ब्रिटिश आणि नंतर आलेल्या प्रशासनिक यंत्रणांनी ही वृत्ती नाहीशी करत लोकांना प्रशासनावर अवलंबून राहायला लावले, परिणामी सारे काही प्रशासनाने करायचे असते ही वृत्ती बळावली व सर्वांच्याच पुढ्यात आली अस्वछ्ता, दुर्गंधी. (आम्हीच आमचा परिसर स्वच्छं ठेवला तर रोगराई नावाची भुताटकी समूळ उखडली जावू शकते यावर नंतर स्वसीतर लिहिणे होणार आहेच.)

वारीच्या एकूण प्रवासातल्या पायाभूत व प्राथमिक सुविधांच्या बाबतीत गेल्या तीन वर्षात सुधारणा झाली असली तरी अजून पल्ला खूप मोठा आहे. जो गाठण्याकरता सध्याचा असणारा वेग फारच कमकुवत आहे. वारीचे स्वागत करते वेळी भक्तिने ओतप्रोत वाहणारे चेहरे पालखीचा मुक्काम हल्ल्यावर पुढचे काही दिवस आ वासून किंवा नाक बंद करून वावरत असलेले दिसतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अजूनही मुक्कामच्या ठिकाणी पुरेसे शौचालय नसणे. कचरा व्हील्हेवाट करणारी यंत्रणा पुरेशी सक्षम नसणे हेच आहे. वारीचा  कालखंड हा पावसाळ्यात असल्याने आधीच साथीचे आजार जोरावर असतात. त्यात वारकर्‍यांसाठी पुरेशी शौचालये उपलब्ध नसल्याने उघड्यावर शौचास बसावे लागते परिणामी वाहत्या पावसाच्या पाण्याबरोबर मलमूत्र जवळील नदीत वा पिण्याचे पाणी मिळण्याच्या स्त्रोतात सामील झाल्याने विषमज्वर सारखे आजार तग धरून राहतात. गेल्या तीन वर्षात फिरते शौचालय वाढले आहेत ही आनंदाची बाब आहे तरी त्यांची निगा राखण्याचे काम होत नसल्याने 10 मधील 8 शौचालये तुंबून असतात, मैला बाहेर वाहणारे असतात. फिरते शौचालय व निर्मल वारी या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला असला तरी त्यांनी घालून दिलेले निकष पूर्ण करणे म्हणजे फारच कमी नफा मिळण्यासारखे असल्याने कुठलीही संस्था ह्या फिरत्या शौचालयांची देखरेख, सांभाळ करण्याकरता फारशी उत्सुक दिसून येत नाही. फिरत्या शौचालयांची देखभाल, स्वच्छता ठेवण्यासाठी दिवसाला प्रती शौचालय २५०० रुपये देण्यात येतात मात्र ही रक्कम कमी असल्याने त्यासाठी फारशे कोणी उत्सुक दिसून येत नाही तर उलटपक्षी प्रशासनाचे म्हणणे आहे की ही रक्कम पुरेशी आहे मात्र जास्त नफा कमवण्याची सवय असल्याने ठेकेदार व तत्सम संस्थांना ते कमी वाटत आहेत. याचमुळे आरोग्य विभागाने मंजूर केलेल्या ८ कोटी रुपयांपैकी निम्यापेक्षा जास्त निधि पडून राहिला आहे. वारीतल्या लोकांनीही हे शौचालय स्वच्छं ठेवले पाहिजे असाही प्रशासनाचा सुर दिसून येतो. ह्या बाबतीत बायो टॉयलेट हा प्रकार सोयिस्कर असताना तो का वापरला जात नाही? हा प्रश्न मला व्यक्तिशः पडला असताना त्या बाबत माहिती काढल्यावर समोर आलेले वास्तव अधिक भयावह होते.

कुठलाही सण, उत्सव, आध्यात्मिक, परमार्थिक एकत्रीकरण, मेळा हे भक्तांसाठी पर्वणी असतात हे मान्य.  ह्यात भक्तांना देव दर्शन होते की नाही, परमार्थिक अनुभूति मिळते की नाही हा भाग निराळा तो व्यक्तीसापेक्ष आहे. मात्र ठेकेदार, शासकीय नेते, प्रशासकीय अधिकार्‍यांना लक्ष्मी दर्शन मात्र हमखास होते यात वादच नाही. पंढरपूर मार्गावर बायो टॉयलेट बनविण्यासाठी कोट्यावधीचा पूर्ण निधि दिला गेला असताना देखील आजतागायत या मार्गावर एकही बायो टॉयलेट उभे राहिलेले नाही हा वारी सारख्या शुद्ध आणि भाभड्या मनाने सुरू असणार्‍या परंपरेत प्रशासन आणि शासन यांनी मिळून मारलेला डल्ला आहे, पाप आहे. आणि हेच काम पुढे सुरू ठेवत आता पंढरपूर मधल्या कचरा कुंड्या देखील अश्याच कागदावर ठेवण्याची तयारी सुरू आहे किंबहुना ते पूर्णत्वास देखील आली असेल. एकट्या पंढरपूर मध्ये ६०० कोटी रुपये वारीसाठी पायाभूत सुविधावर खर्च होतात तर एकूण पुणे जिल्ह्यात हा खर्च किती असेल आणि त्यात किती डल्ला मारला जात असेल हा विचार डोळे पांढरा करणारा ठरतो. तुकाराम मुंढे सारखा प्रशासकीय सिंघम लोकप्रतिनिधींना नको असतो. आज पंढरपूरात जी काही स्वछ्तेसंबंधी यंत्रणा कामाला लागलेली दिसते ती त्यांचीच लावलेली शिस्त आहे. ६५ एकरच्यावर चंद्रभागेच्या परिसरातले काढलेले अतिक्रमण असो किंवा रोज शेकडो टन कचरा उचलने असो या कामातील सुसूत्रतेचे वाहक तुकाराम मुंढे आहेत. कधीकाळी चंद्रभागा मानवी मैल्यामुळे मैली होत होती. वारकरीं नदीपात्रात पायदळी मैला तुडवण्याच्या नरकप्रवास सोसत होते तेव्हा यातून बर्‍याच अंशी या माणसाने मुक्तता दिली आहे. मात्र हे एवढ्यावरच थांबायला नको. प्रशासकीय अधिकार्‍यात मलिदा खाणे ही वृत्ती जावून सेवा देणे ही सद्वृत्ती रुजायला हवी तरच पायाभूत सुविधा भक्कम रित्या उभ्या राहतील.

वारीच्या मुक्क्माच्या प्रत्येक गावात कंपोस्टची मोठी यंत्रणा असायला हवी जेणे करून पालखी पुढे गेल्यावर मागे राहिलेले उष्टे अन्न, भाजीपाला यांचे कंपोस्ट खत तयार करता येईल. ज्याचा फायदा शेतीसाठीच होईल. शौचालयांसाठी बायोगॅस यंत्रणा उभारून त्या त्या गावातल्या विजेचा प्रश्न देखील मार्गी लागू शकतो. नमामी चंद्रभागा ही योजना केवळ पांढर्‍यावर काळे एवढीच न राहता केवळ चंद्रभागाच नाही तर पूर्ण भीमा खोर्‍यात कुठेही दूषित पानी सोडण्यास मज्जाव केला पाहिजे. चंद्रभागेत वा भिमेच्या खोर्‍यात सोडण्यात येणारे पाणी  हे प्रक्रिया करूनच सोडले गेले पाहिजे यावर पुरेपूर लक्ष असले पाहिजे. केवळ कारखाने नाहीत तर गावातून, शहरातून सांडपाण्याच्या रूपात येणार पाणी देखील प्रक्रिया करूनच शास्त्रोक्त पद्धतीनेच सोडले गेले पाहिजे. साखर कारखान्याचे दूषित व केमिकलयुक्त पाणी वासाने आणि नजरेने जाणवते म्हणून ते नदी खोर्‍यात सोडणे जेवढे हानिकारक आहे तेवढेच गावागावातून, शहरातून सोडण्यात येणारे सांडपाणी देखील नदीसाठी भयावह आहे.

वर उल्लेख केल्या प्रमाणे लोकांनी स्वतः होवून आता आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. परिसर स्वच्छं असेल तरच आणि तरच आपण निरोगी राहू हे स्वत:ला बजावून सांगण्याची वेळ आली आहे. शेंगदाण्याच्या, शेंगांच्या टरफलापासून एसटीच्या तिकीटापासून ते खाद्यपदार्थांच्या वेष्टनापर्यंत काहीही कुठेही न टाकता ते कचरा कुंडीतच टाकणे आपले कर्तव्य समजायला हवे. वारीत जसे आरोग्य विभागाचे लोक वारकर्‍यांची काळजी घेण्यासाठी औषधे वाटप करतात तसेच, ठराविक उंचीच्या रोपांचे वाटप होवून त्यांचे रोपण झाले तर वारीच्या  काळातला उन्हाचा ताप कमी होण्यास मदत होईल. अर्थात यात शेतकरी, प्रशासन आणि वनविभाग प्रशासन यांचे सहकार्य जितके जास्त लवचिक असेल तितक्या लवकर पांढर्‍याशुभ्र हिर्‍यासारख्या भासणार्‍या वाहत्या वारीत चंद्र्कोरीच्या आकाराच्या चंद्रभागेला आणि संपूर्ण भीमा खोर्‍यालाच पाचुचा हिरवा रंग अधिक शोभून दिसेल. देव स्वतःच्या प्रशंसेने आनंदी होवून लवकर पावतो असे म्हणतात पण तो त्याहून अधिक त्याच्या भक्ताची काळजी घेतली तर लवकर पावतो असे ही शास्त्रात संगितले आहे. विठ्ठल नावाच्या समुद्राला मिळून स्वतः देखील विठ्ठलरूप होणार्‍या त्याच्या वारकर्‍यांची ही काळजी घेतली तर आपल्या सार्‍यांनाच विठ्ठल लवकर पावेल. नाही तरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिले आहेच  जो जे  वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ फक्त काय मागावे या जाणिवेत विठ्ठल असावा..

योगेश मनमोहन परुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषकymp-chandrabhagechya tiri

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s