वारीच्या वाटेवर …

पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास घेती |

कबीर मोमीन लातिब मुसलमान, शेन न्हावी जन विष्णुदास ||

काणोपात्र खोडू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी |

चोखामेळा बंका जातीचा महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ||

या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी माणुसकीचा धर्म सांगितला आहे. अवघ्या जाती आणि धर्मांचे रूपांतर माणुसकीच्या धर्मात करण्याचे कसब ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारामध्ये आहे. या विचारांनी प्रेरित होवून दरवर्षी लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठालाच्या दर्शनाला जातात. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या अनेक भागातून देखील लोक या वारीत वारकरी म्हणून सामील झालेले असतात.

इतक्या मोठ्या संख्येने लोक पायी चालत जात असल्याने साहजिकच त्यांच्या सोयी सुविधांचा प्रश्न निर्माण होणारच. राज्यशासन आणि सरकारी यंत्रणा या वारीतील लोकांना आणि एकूणच या वारीला सोयी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरल्या आहेत, असेच खेदाने म्हणावे लागेल. यंदातील वारीतील पायाभूत सुविधांचा घेतलेला हा आढावा.

ymp vari3ज्ञांनेश्वर महाराजांच्या पालखीसोबत अडीच लाख लोकांचा जनसमुदाय अर्धा रस्ता व्यापून सुमारे ४ किलोमीटर रस्त्यावर पसरलेला होता. जनसागर म्हणजे नेमके काय असते ते या अथांग पसरलेल्या गर्दीकडे पाहून सहज लक्षात येवू शकतं. एवढी प्रचंड गर्दी असताना खरं तर गडबड, गोंधळ, बेशिस्तपणा, अस्वच्छता या सर्व गोष्टी घडणे खरं तर अगदी सहजचं अपेक्षित असतं; मात्र ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या असणार्‍या या वारीमध्ये अश्या गोष्टींचा अभाव जाणवत होता. ग्रामीण भागातील ही मंडळी एखाद्या तरबेज मेनेजमेंट गुरूला सुद्धा लाजवेल, इतकी या वारीची शिस्तब्ध आखणी करतात. इतक्या लोकांचे ही मंडळी कशी काय व्यवस्था करत असतील हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा अनेक वर्ष ही वारी चालत असल्यामुळे हे साध्य होत असावे हे एकच वरकरणी उत्तर स्वताला गवसते. असो ..

नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ||  या तुकाराम महाराजांच्या उक्तीचा तर वारीत पदोपदी प्रत्यय येत राहतो. म्हणूनच कदाचित मनाच्या स्वच्छतेबरोबरच वारीच्या मार्गावरील परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेण्याचा परोपरी प्रयत्न त्यांच्याकडून होतो. वारकर्‍यांच्या या शिस्तप्रिय आचरणाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पंढरीच्या या वारीमध्ये जागोजागी अनेक सेवाभावी वैद्यकीय संस्थांनी ठराविक अंतरावर आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आपल्याला दिसत राहते. त्यामुळे मोफत औषध व उपचारांची सुविधा वारीतील लोकांना उपलब्ध होते. १५ दिवसाच्या या सलगच्या पायपिटीमध्ये या वैद्यकीय शिबिरात प्रत्येक डॉक्टर वारीतील लोकांचे मनोभावे सेवा करत असतो. देवाची सेवा करणारे अनेक भक्त भेटतील पण देवच भक्तांची सेवा करतांना फक्त वारीतच दिसतो कारण आपल्या समाजात डॉक्टरांना देवस्थानीच मानले गेले आहे.

खाजगी संस्थांकडून मनोभावे वारीतल्या लोकांची सेवा सुरू असताना सरकारी आरोग्य विभागाचे अधिकारी व त्यांचे कर्मचारी मात्र सेवा बजावण्याचा उत्तम अभिनय करत होते. इतकेच नाही तर केवळ दोन चार गोळ्या वारकर्‍यांचा हातावर टेकवत, तोंडाला (संसर्ग होवू नये म्हणून) फडकं बांधलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांचे चारचाकी वाहन गर्दी टाळून पार पुढे जावून थांबत होते. वारीत चालणार्‍या वारकर्‍यांचा मनात कितीही परिसर स्वच्छ ठेवण्याचे विचार आले तरीही शासनाच्या सहकार्याशिवाय ते कदापि शक्य नाही, हे हि तितकेच खरे. शासनाच्या औदासिण्याचा हा विषय महत्वाचा ठरतो कारण वारीच्या मार्गावर कुठेही शासनाने शौचालयांची व्यवस्था केलेली नाही. काही ठिकाणी जी आहे ती अत्यंत तोडकी आहेत.

पंढरीच्या या वारीत ज्ञानोबा आणि सोपान काका अश्या अनेक पालख्या मार्गस्थ असतात. यातही या प्रत्येक पालखीचा मार्ग आधीच ठरलेला असतो. आणि वर्षानुवर्षे या पालख्या त्याच मार्गावरून मार्गक्रमण करत आहेत. या प्रत्येक पालखीसोबत जवळपास अंदाजित दीड ते दोन लाखाचा जनसमुदाय मार्गक्रमण करत असतो. हे सर्व पूर्वनियोजित असताना सुद्धा प्रशासन म्हणा व शासन म्हणा नियोजनात जाणीवपूर्वक ढिसाळपणा करतं असे राहून राहून वाटते. पालखीच्या मार्गावर असणार्‍या प्रत्येक गावात महामार्गापासून जवळच शौचालय बांधणे सरकारी यंत्रणेला कठीण नक्कीच नाही. यातही सरकारने जर वारीच्या मार्गावरच हि शौचालये बांधली तर वारीचा कालावधी संपल्यावर त्या त्या गावातील लोकं त्या शौचयालयांचा वापर करू शकतात. एरव्ही देशबाहेरच्या यात्रांसाठी या पूर्वी शासन काहिशे कोटी रुपये खर्च करत होतेच की, त्याही पेक्षा खूप कमी पैशात सरकारी यंत्रणा वारीसाठी शौचालये बांधून देवू शकतात. ह्याने वारकर्‍यांचे व गावातील लोकांचे आरोग्य देखील सांभाळले जावू शकते.ymp vari20

शासनाच्या या उदासीनतेचा परिणाम वारकर्‍यांनाच भोगावा लागतो. वारीदरम्यान झालेल्या अस्वच्छतेमुळे कित्येक वारकरी आजारी पडतात आणि त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा हा प्रवास आजार अंगावर घेवुनच करावा लागतो. बरं इतका सगळा ताप सहन करून पंढरपूरला विठूरायच्या दर्शनाला पोहचल्यावर तरी सर्व आलबेल आहे का?  विठ्ठलाच्या दर्शनासाठी असणारी रांग हि चार ते पाच माळ्यांच्या इमारतीमध्ये समावलेली आहे. दाटीवाटीनेच लोकांना या रांगेतून प्रवास करावा लागतो. अतिशय किचकट, कोंदाट, आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत कुचकामी असलेल्या या इमारतीमध्ये अनावधानाने ‘मांढरदेवी’ सारखी एखादी दुर्घटना घडली तर तिचे परिणाम खूप भयावह असतील, यात कुणाचेही दुमत असण्याचे काही कारण नाही.

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केल्यास अश्या दर्शनच्या रांगा या मोकळ्या सभागृहात असाव्यात हे अपेक्षित आहे; मात्र पंढरपूरच्या दर्शनरांगेत उभे राहिल्यानंतर एखाद्या बंदिस्त रांगेत उभे राहिलो आहोत असे वाटते. म्हणून आता तरी शासनाने देवाच्या भरवश्यावर आपत्ती व्यवस्थापन सोडणे बंद करावे हेच योग्य ठरेल. तसे तर वारीचे समग्र विवेचन (पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने ) एका भागात करणे ही योग्य होणार नाही म्हणून तूर्तास या वेळी एवढेच उर्वरित पुढील लेखात तो पर्यंत जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल,

योगेश मनमोहन परुळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषक

ymp vari10.png

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s