वाट पाहीन पण एस टी नेच जाईन …

सहकार्‍यांनो नमस्कार,

आधी विचार केला मित्रहो लिहूया मग विचार केला कि मला केवळ वाचून सोडून देणारे लोक, मित्र नको आहेत. सुंदर व आकर्षक महानगर, शहर बनवणारे सहकारी हवे आहेत. म्हणून सुरवाती पासूनच आपल्या सार्‍यांना मी सहकारी मित्र म्हणूनच का संबोधू नये ?

ब्लॉगच्या अधिकृत पहिल्या लेखाची सुरवात कुठल्या विषयाने करूया हा विचार सुरू असताना रस्ते हा विषय घेवून करूया असे माझ्या सहकार्‍यांनी सुचवले मात्र मला सर्वव्यापी विषय हवा होता आणि त्यातही तो पायाभूत सुविधेशी निगडीत हवा हि तर मुख्य बाब. त्यावेळी चटकन डोळ्यासमोर आली ‘एस टी’, लाल डबा म्हणजेच महाराष्ट्राची रक्तवाहिनी. महाराष्ट्रात एकवेळ रस्ता सापडणार नाही पण एस टी सापडेल. अर्थात रस्ता तिथे एस टी हे जरी महामंडळाचे ब्रीदवाक्य असले तरी रस्ता नसलेल्या जागी देखील एस टी पोहचताना मागच्या आणि या पिढीने देखील पाहिले आहे. म्हणून महाराष्ट्राची रक्तवाहिनी असलेल्या एस टी ह्याच विषयाने माझ्या ब्लॉग च श्री गणेशा करत आहोत. खाजगी प्रवासी वाहतूक जरी प्रचंड वाढली तरी एस टी स्टँड वर गेल्यावर आजही हा आवाज हमखास कानी पडतो ‘ वाट पाहीन पण एस टी नेच जाईन ‘

मुंबईचा धुराने काळवंडलेला रस्ता मागे टाकून आम्ही दोन्ही बाजूने हिरवा शालू पांघरलेल्या कोकणच्या नागमोडी रस्त्याला लागलो. मुंबई एकदा सोडली की राज्य परिवहन महामंडळाच्या लाल आणि हिरव्या रंगाच्या गाड्या लक्ष वेधून घेतात. ‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी’ या ब्रीदवाक्याला शब्दशः जागून अहोरात्र सेवा पुरवणारं एस. टी. महामंडळ म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राची जीवनरेखाच. पूर्वी कोकणातल्या गावी एस.टी.च्या रातराणीने जाताना गाडीतले निळे दिवे लागले की कसं श्रीमंत वाटायचं… याचं वर्णन शब्दांत करणं कठीणच! आज एस.टी.चे निळे दिवेच लुप्त झालेत आणि दिव्यांबरोबरच एस. टी.चा तो अवर्णनीय प्रवाससुद्धा. संपूर्ण महाराष्ट्रभर २४७ आगारं, ५७५ बसस्थानकंआणि १५,५०० गाड्या याचं अवाढव्य जाळं असणारी ही परिवहन सेवा खरंतर महाराष्ट्राच्या डोईवरचा मानाचा शिरपेच आहे. पण सरकारच्या दुर्दैवी धोरणांमुळे आणि कल्पकतेचा अभाव असणारे उच्चाधिकारी लाभल्यामुळे हे महामंडळ आज मरणपंथाला लागलं आहे.

खरंतर २४७ आगारं आणि ५७५ बसस्थानकं ही एखाद्या आस्थापनाची सर्वात मोठी संपत्ती. पण महामंडळाने या संपत्तीचाच सततचा घसारा सुरू केला आहे. महामंडळाच्या कोणत्याही आगारात जा आणि तिथली प्रवाशांसाठी असणारी बसण्याची व्यवस्था पहा. काय नजरेला पडतं? सगळीकडे अस्वच्छता पसरलेली. बसण्याच्या आसनांचं काँक्रिट जागोजागी तुटलेलं, प्रवाशांना मोकळी आणि स्वच्छ हवा मिळावी म्हणून बसवलेले पंखे बंद, ते सुरू असलेच तर त्यांच्यावर जमा झालेली ढिगभर जळमटं तसंच प्रचंड उकाडा आणि या उकाड्यात डोळ्यांत प्राण आणून गाडीची वाट पाहणारे अगतिक प्रवासी. त्यातच कोणाला लघवीला किंवा शौचाला जावं लागलं तर नजरेस पडतात शौचाने भरून वाहणारी शौचकुपं, हात धुण्यासाठी जावं तर पाणीच नसलेली बेसिन्स, बर्याच ठिकाणी बत्त्याच गुल…, बरं जिथे सेवाभावी संस्था अशी शौचालयं चालवत आहेत तिथेही स्त्रियांकडून लघवी-शौचाचं शुल्क आकारलं जात आहे, विचारलं तर सांगितलं जात आहे की महिलांची शौचालयं जास्त घाण होतात. हे कारण असू शकतं का? नियमांप्रमाणे महामंडळाच्या शौचालयांमध्ये महिलांना निःशुल्क सेवा देणं बंधनकारक आहे. मात्र महामंडळाने नियमच धाब्यावर बसवताना शौचालयांच्या जागी विविध आजारांची माहेरघरं सांभाळली आहेत असं वाटावं इतकी भयाण परिस्थिती या शौचालयांची आहे.

कोणाला तहान लागली तर पाणी पाऊच विकत घेण्याशिवाय पर्याय नाही कारण बर्याच पाणपोया उद्घाटनानंतर लगेच बंद झाल्यात. गाड्यांची चौकशी करण्यासाठी जावं तर उत्तरासह अपमानसुद्धा पदरात पाडून घ्यावा लागतो. महामंडळाच्या गाडीतल्या प्रथमोपचार पेट्या तर खरंच पाहण्यासारख्या असतात. कारण त्या फक्त पाहण्यासाठीच ठेवलेल्या आहेत. त्यात प्रथमोपचाराचं कोणतंही साहित्य नसतं. महामंडळाच्या या सर्व समस्यांना जबाबदार कोण?

खरं तर यातील बरेचसे प्रश्न हे शुल्लक निधीचा नैतिकतेने वापर केला तरी सुटण्यासारखे आहेत पण दुर्दैवाने तेवढी नैतिकता जपणारे राजकीय अध्यक्ष आणि उच्चाधिकारी उपाध्यक्ष या महामंडळास लाभलेले नाहीत. सरकारची उफराटी धोरणंसुद्धा या महामंडळाच्या जीवावर उठलेली आहेत. खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांना ४ टक्के पथकर तर सरकारचाच उपक्रम असणार्या महामंडळास मात्र १८ टक्के पथकर हा कुठला न्याय? या खाजगी वाहनांना कोणत्याही सवलती द्यायच्या नसतात. फक्त फायदा मिळवणं हाच त्यांचा उद्देश. तर फक्त सेवा हाच धर्म असणार्या महामंडळास मात्र १८ टक्के कर? त्यावर कडी म्हणजे रस्त्यात येणारे सर्वच्या सर्व टोलसुद्धा भरायचे! महामंडळाला हा टोल जरी माफ केला तरी भक्कम सेवा देण्यासाठी दर आठवड्याला १२ नवीन वाहने विकत घेता येतील. ही सेवा जिवंत राहणं हे सामान्य नागरिकांच्याही हिताचं आहे. त्यामुळे सामन्यांनीही आपल्या या हक्काच्या सेवेचा लाभ घ्यावा हीच माफक अपेक्षा!

ता.क : आकडेवारी चुकली असल्यास योग्य त्या संदर्भासाहित नजरेस आणून द्यावी चूक सुधारली जाईल

योगेश परूळेकर – पायाभूत सुविधा अभ्यासक विश्लेषक   

One thought on “वाट पाहीन पण एस टी नेच जाईन …

  1. खुप सुंदर वाक्य रचना आहे. विषय सुदधा खरच सर्व सामान्य माणसाच्या हिताचा आहे.
    पुढील blogs साठी शुभेच्छा.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s